जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय – सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स

मुंबई, दि. २१ : सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे.  भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी काढले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती क्रिस्टोडोलाइड्स बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी, व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान उपस्थित होते.
कार्यक्रम दरम्यान राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे घंटानाद करण्यात आला.

राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स म्हणाले, सायप्रस हा युरोपीय महासंघ आणि युरोझोनचा एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. सायप्रसकडे सध्या यूरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद आहे. या अध्यक्षपदाच्या काळात सायप्रसने भारत आणि यूरोपीय महासंघ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सायप्रसच्या अध्यक्षपदाच्या पहिल्याच महिन्यात भारत आणि यूरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार करारावर सहमती झाली होती. सायप्रस हा भारत, यूरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्य पूर्व या क्षेत्रांना जोडणारा एक नैसर्गिक दुवा म्हणून काम करतो.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागील वर्षाच्या सायप्रस भेटीचा संदर्भ देत राष्ट्रपती म्हणाले, सध्या सुरू असलेल्या या द्विपक्षीय दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील  वित्तीय सेवा,  तंत्रज्ञान आणि नाविन्यता,  शिपिंग आणि कनेक्टिव्हिटी व ऊर्जा क्षेत्रात मजबूत संबंध निर्माण करीत द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे  हा आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागील वर्षी झालेल्या सायप्रस भेटीदरम्यान ‘सायप्रस स्टॉक एक्स्चेंज’ आणि ‘एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंज’  यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांना बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यामुळे भारतीय आणि युरोपीय वित्तीय व्यवस्थांमध्ये अधिक सुलभता येईल आणि गुंतवणुकीचे नवीन मार्ग खुले होतील.

भारत ही जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्थेपैकी एक आहे, तर युरोप ही जगातील सर्वात मोठी आणि स्थिर बाजारपेठ आहे. जगातील या दोन मोठ्या लोकशाही व्यवस्था एकत्र आल्यास सुमारे २ अब्ज लोकांची एक विशाल बाजारपेठ तयार होते. या भागीदारीमुळे दोन्ही देशांसाठी भविष्यात अनंत संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजारातील भांडवली गुंतवणुकीविषयी आणि सायप्रस – भारतातील गुंतवणूक संधीबद्दल भाष्य केले. कार्यक्रमाला सायप्रस व भारताचे राष्ट्रगीताने सुरुवात झाली. यावेळी सायप्रस देशातील प्रतिनिधी मंडळातील मंत्री, सदस्य, राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकारी उपस्थित होते.

000

निलेश तायडे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *