जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. ३० : जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात गेली 18 वर्षे अत्यंत निष्ठा, कष्ट व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुजाता बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे, लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, आरोग्य शिबिरे, जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमांमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहे.

कोरोना काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जिल्हास्तरीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’सह विविध पुरस्कारांनी ही सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र आहे.

०००

अमरज्योत कौर अरोरा/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *