मुंबई, दि. १२ : एमआयडीसी क्षेत्र व परिसरातील गावांसाठी स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन क्लस्टर उभारण्याची गरज आहे. यासाठी एमआयडीसी-ग्रामपंचायतींमध्ये समन्वयाची गरज असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावले उचलण्याची गरज असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सचिव राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, एमआयडीसी क्षेत्रातील गावांसाठी क्लस्टर पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारल्यास ग्रामपंचायतींवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रालगत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होईल. स्वच्छ भारत अभियान किंवा केंद्र शासनाच्या अन्य योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींनी प्रस्ताव सादर केल्यास त्यांना राज्यस्तरावरून मान्यता देण्याबाबत सकारात्मक विचार केला जावा. या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन प्रस्ताव इतर कोणत्याही योजनेत प्रस्तावित नाहीत, याची पडताळणी करण्यात यावी.
स्वच्छ भारत अभियान किंवा नगरविकास विभागाच्या नियमित योजनांतर्गत दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या मूलभूत सुविधांव्यतिरिक्त मागील एक-दोन वर्षांत घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रस्ताव संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींनी प्रस्ताव सादर केल्यास, तो अन्य कोणत्याही योजनेत समाविष्ट नसल्याच्या अटीवर राज्य स्तरावर निश्चितपणे विचारात घेण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सकारात्मक विचार करावा, असेही मंत्री तटकरे म्हणाल्या.
वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि त्यातून निर्माण होणारा कचरा लक्षात घेता अशा सामूहिक व्यवस्थेमुळे परिसरातील प्रदूषण व अस्वच्छतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविता येईल. एमआयडीसी आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून या योजनेला गती देण्याची आवश्यकता असून, एमआयडीसीकडून जमा होणाऱ्या निधीतील योग्य हिस्सा घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरण्याबाबतही विचार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
००००००
एकनाथ पोवार/विसंअ