मुंबई दि. २० : महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने मागील वर्षीपासून ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा दिला आहे. यावर्षी या राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विस्तारामुळे, राज्यासोबतच देशभरात व जगभरात विविध ठिकाणी जी सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमांद्वारे साजरे करतात त्यांना देखील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, त्यांच्या उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाणार असून, त्यांच्या उपक्रमांना भरघोस बक्षिसांच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील लाभणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या २३ जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ह्यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.
या वर्षीच्या महागणेशोत्सव उपक्रमांचा शुभारंभाही यानिमित्ताने होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव विधायक उपक्रमांसह शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी उत्सवांचा इतिहास, उत्सव आणि सामाजिक भान,आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, विधायक स्वरूपातील कार्यकम संयोजन, नेतृत्व विकास या विषयांवर तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात मुंबईतील ज्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली, त्या केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंडळाच्या शतकोत्तर वाटचालीचा मार्गदर्शनपर आढावा घेण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी भाषा, मराठी संस्कृती, विकसित भारताच्या संकल्पनेतील ‘वसुधैव कुटुम्बकम’ या उक्तीप्रमाणे असणारी वैश्विक कल्याणाची भावना यांचा प्रचार व प्रसार, मूल्याधारित सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांना बळकटी इत्यादी साध्य करणे अपेक्षित आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुल येथे सकाळी १० ते सायं ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अकादमीच्या यूट्युबवाहिनीवर उपलब्ध करून देण्यात येईल. जगभरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून करण्यात येत आहे.
000
संजय ओरके/विसंअ