नाशिक, दि. ६ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून लहान-मोठ्या उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच कुंभमेळ्यात येणारे भाविक, पर्यटकांमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ब्रँडिंगची मोठी संधी आहे. या संधीचा लाभ जिल्ह्याला व्हावा यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, नाशिकच्या सहकार्याने आज हॉटेल ताज गेट वे येथे कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यानिमित्ताने आयोजित विविध सत्रात नाशिकला औद्योगिक विकासासाठी पूरक वातावरण असून जिल्हा भविष्यातील औद्योगिक विकासाचे केंद्र असेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, उद्योग-व्यवसायांना गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये पूरक वातावरण आहे. दळणवळणाच्या चांगल्या सुविधा येथे आहेत. त्यात नवीन महामार्गांची भर पडत आहे. त्यामुळे औद्योगिक विकासासह कृषी, पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा स्थानिकांसह सर्वांचाच आहे. कुंभमेळ्यात स्थानिकांना सहभागी करून घेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने भाविक आणि पर्यटकांचे आपण सर्व मिळून सामूहिकपणे स्वागत करू या, असे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले.
महापौर श्रीमती आडके-आहेर म्हणाल्या, नाशिक येथे उद्योग, व्यवसायाला मोठी संधी आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. नाशिककर सामाजिक उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह म्हणाले, नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराचा तीर्थाटन ते पर्यटन असा विस्तार होणार आहे. त्यामुळे वाराणसी, अयोध्येच्या धर्तीवर या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने या भागात दीर्घकालीन पायाभूत सोयीसुविधांचा विकास होत आहे. याबरोबरच स्थानिक कलावंताच्या सहकार्याने सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळाली आहे. आगामी काळात गांधी तलाव परिसरात ‘लाइट ॲण्ड म्युझिक शो’ साकारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्री. शर्मा म्हणाले, एनएमआरडीएच्या माध्यमातून परिसराच्या विकासाचे दीर्घकालीन नियोजन करण्यात आले आहे. ते उद्योग, व्यवसायाला पूरक ठरणार आहे. तसेच कुंभमेळ्यामुळे उद्योग, व्यवसायाला चालना मिळणार आहे.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री म्हणाल्या, कुंभमेळ्यानिमित पायाभूत सुविधा निर्मितीचे काम सुरू आहे. गोदावरी नदी निर्मळ आणि बारमाही प्रवाहित ठेवण्यासाठी तसेच भविष्यात पिण्याचे पाणी, दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, राज्य शासनाचे उद्योगस्नेही धोरण आहे. मैत्री कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. अनेक कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. विविध सुविधा ऑनलाइन झाल्या आहेत. प्रशासन जिल्हा विकासाच्या विविध योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा श्रीमती तुंगार म्हणाल्या, आगामी कुंभमेळ्याच्या माध्यमातून लहान लहान व्यवसायांना चालना मिळणार आहे. शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. ती लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेदांत राठी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, निमा, आयमाचे पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, स्टार्टअप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००