मुंबई, दि. २० : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यावर भर देत प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याचा निर्धार राज्य शासनाने व्यक्त केला. ‘पॉवरिंग महाराष्ट्राज इकॉनॉमी थ्रू एआय, ई-गव्हर्नन्स अँड डिजिटल इनोव्हेशन’ या विषयावरील परिसंवादात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी डिजिटल परिवर्तनाच्या संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा केली.
तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स व सीएसआर विषयक उच्चस्तरीय ‘टेक महाइम्पॅक्ट 2026’ परिषदेत “एआय, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल इनोव्हेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती” या विषयावरील पहिल्या चर्चासत्रात डॉ.ज्ञानेश्वर मुळे, भुवनेश्वरी एस, अजय प्रसाद श्रीवास्तव, अभिषेक लाहिरी, के.वेंकटेशम, अवर्तन बोकील आणि भगवान पाटील या मान्यवरांनी सहभाग घेतला.
या परिसंवादात राज्य शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आयुक्त भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, शासन केवळ कागदपत्रांचे डिजिटायझेशन करत नसून संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेचे डिजिटलायझेशन आणि ‘गव्हर्नमेंट प्रोसेस री-इंजिनिअरिंग’वर काम करत आहे. विविध विभागांचे डेटाबेस ‘एपीआय इंटिग्रेशन’द्वारे परस्पर जोडण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांना सेवा मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. तसेच एआय अॅनालिटिक्सच्या मदतीने समस्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा अंदाज घेऊन डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया मजबूत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आयएफएस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी समस्येचे अचूक विश्लेषण आवश्यक असल्याचे सांगितले. दिल्लीतील पासपोर्ट सेवा सुलभीकरणाचे उदाहरण देत त्यांनी तंत्रज्ञानाचा उद्देश नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणे हा असावा, असे स्पष्ट केले. सीएसआर 2.0 च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ यंत्रणा सुधारण्यासाठी नव्हे, तर सामाजिक परिवर्तनासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
बृहस्पती टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संचालक तथा माजी पोलीस अधिकारी के. व्यंकटेशम यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एआयमुळे मोठे बदल घडून येतील, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार एआयच्या साहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ आणि ग्राफिक्स तयार करता येतील, असे त्यांनी नमूद केले.
एसटीपीआय पुणेचे संचालक अजय प्रसाद श्रीवास्तव यांनी कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराची माहिती देताना साखर उद्योगासाठी विकसित करण्यात आलेल्या अॅपचा उल्लेख केला. हे अॅप एआयच्या मदतीने ऊस काढणीची योग्य वेळ निश्चित करते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होत असून साखर कारखान्यांवरील गर्दीचे नियोजनही सुलभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयर्न माउंटन इंडियाचे चीफ ऑफ ग्रोथ बिझनेस अभिषेक लहिरी यांनी शासकीय योजनांमध्ये एआयचा वापर करताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘एक्सप्लेनेबल एआय’ची संकल्पना प्रशासनात विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयर्न माउंटन इंडियाचे अवर्तन बोकील यांनी भविष्यात तंत्रज्ञानाचा वेग अधिक वाढणार असल्याचे सांगत ग्रामीण भागापासून डिजिटल परिवर्तनाची सुरुवात करण्याची गरज व्यक्त केली. सीएसआर आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी समन्वय साधून व्यापक सामाजिक बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी नमूद केले.
या परिसंवादातून महाराष्ट्र शासन आणि ‘महाआयटी’ प्रशासनात एआयचा प्रभावी वापर करून पारदर्शकता वाढविणे, सेवा वितरण अधिक कार्यक्षम करणे आणि नागरिकांचे ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याचे परिसंवादातून स्पष्ट करण्यात आले.
0000
संजय ओरके/ वि.स.अ