उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २६ : “श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध आणि प्रगतिशील होवो,” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त त्यांनी गणेश भक्तांसह राज्यातील सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पवार आपल्या संदेशात म्हणतात की, संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक वा सांस्कृतिक पर्व राहिला नसून तो लोकसहभाग, लोकजागृती आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव झाला आहे. यंदा महायुती सरकारने गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्योत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा समाजाला एकत्र ठेवण्याचा, बांधिलकी जपण्याचा आणि एकोप्याची भावना दृढ करण्याचा उत्सव आहे. कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने हा सण आपण साजरा करावा. त्याचबरोबर शिस्त व नियमांचे पालन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे भान ठेवावे. सर्वांनी सामाजिक एकोप्याची परंपरा जपत सौहार्द व ऐक्याने गणेशोत्सव साजरा करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

श्रीगणरायांच्या आगमनानं शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची समृद्धी, घराघरात सुख-समाधान आणि समाजात सकारात्मकतेचे बळ निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादाने अधिक वेगवान व फलदायी होईल, अशी भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *