आदिशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावर १५ दिवसांत समित्या स्थापन करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४ : महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविण्यात येणारे आदिशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी  १५ दिवसांत ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कारासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत  गाव, तालुका, आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. विविध विभागांमधील समन्वयाद्वारे महिलांच्या समस्या सोडविणे, योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक पातळीवर महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करणे, विधवा प्रथा, हुंडा प्रथा, स्त्री भ्रुण हत्या रोखणे, एकल महिलांच्या योजनांसंदर्भात जनजागृती करणे यासाठी ग्रामस्तरीय समिती काम करणार आहे. आदिशक्ती अभियान हा महिलांच्या सक्षमीकरणाचा एक व्यापक उपक्रम आहे.

सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर त्वरित उपाययोजना आखणे, शासकीय योजनांची माहिती व लाभ महिलांपर्यंत पोहोचविणे, महिला उद्योजकता, स्वयंपूर्णता, शिक्षण, आरोग्य व पोषणासंदर्भात विशेष उपक्रम, ग्रामस्तरावर महिलांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी समिती सक्रिय करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे, सहसचिव वि.रा.ठाकूर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *