अंदरसूल येथील मुलींच्या शाळा इमारतीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक,दि.२३: तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात अन्य देशांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज अंदरसूल जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलींच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख,  सरपंच लता जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, सारथी, बार्टी, महाज्योतीच्या माध्यमातून राज्य शासन विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण घ्यावे. अंदरसूल जिल्हा परिषदेच्या या शाळेतून विद्यार्थी शालेय जीवनापासूनच यासाठी तयारी करत आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद असून यामध्ये शिक्षकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतिशय महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळे आज मुली विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मुलींनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवावे, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.

या सोहळ्याप्रसंगी अंदरसूल जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी जपानी भाषेतून अनोख्या पद्धतीने मंत्री भुजबळ यांचे स्वागत केले. तसेच या शाळेतील विद्यार्थिनींनी कोडिंग- डिकोडिंग च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीने २७ अंकी आकड्यांचे वाचन उपस्थितांसमोर सादर केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *