बीड दि.९ ,(जिमाका): हिंदू नाथ संप्रदायाचे आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (सावरगाव घाट, ता. आष्टी) येथील तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्याचा आढावा नुकताच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत गडाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलत भूसंपादनासाठी लागणाऱ्या आवश्यक रक्कमेबाबत आज अंतिम निर्णय घेण्यात आला. तसेच भूसंपादनाचा सविस्तर प्रस्ताव त्वरित मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. पर्यटन आराखड्याची पाहणी करताना पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी विकासकामांमध्ये मानवी दृष्टिकोन आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला. गडावर येणाऱ्या दिव्यांग भाविकांसाठी खास आणि सुलभ सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच संपूर्ण परिसरात चोवीस तास आरोग्य सुविधा आणि भाविकांसाठी शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, आद्यनाथ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांची संजीवन समाधी येथे असल्याने हे स्थळ देशभरातील करोडो नाथभक्तांचे मुख्य श्रद्धास्थान आहे. गडावर दरवर्षी फाल्गुन अमावस्या, ऋषीपंचमी आणि रंगपंचमी या उत्सवांना देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. यामध्ये फाल्गुन अमावस्येचा उत्सव अतिशय भावनिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या मोठा असतो.
जिल्हाधिकारी श्री.जॉन्सन यांनी स्पष्ट केले की, गडावरील दैनंदिन भाविकांची संख्या ६ हजारांपासून ते विशेष उत्सवाच्या दिवशी १० लाखांपर्यंत पोहोचते. त्यामुळे या विकास आराखड्यामध्ये गर्दीचे व्यवस्थापन वाहनतळ आणि वाहतूक कोंडी रोखणे या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सर्वोच्च गर्दीच्या दिवसांचे व्यवस्थापन डोळ्यासमोर ठेवूनच हा आराखडा अंतिम केला जात आहे. प्रस्तावित विकास आराखड्यातील प्रमुख वैशिष्ट्ये: प्रशासनाने तयार केलेल्या या सर्वसमावेशक विकास आराखड्यात खालील कामांचा समावेश करण्यात आला आहे. * प्रवेश व परिसर: भव्य महाद्वार, मुख्य मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मुख्य प्रवेश अनुभव सुधारणे. * आध्यात्मिक व शैक्षणिक: भव्य स्मारक, ऐतिहासिक संग्रहालय, अभ्यासिका, ध्यानकक्ष आणि व्हीआयपी सुविधा. * भाविकांचे कल्याण: सुसज्ज प्रसादालय, आधुनिक भक्त निवास, दुकाने आणि सुनियोजित गोशाळा. * परिसर सौंदर्य: देव तलाव पुनरुज्जीवन, साईट व्ह्यूज आणि गडाकडे येणारे रुंद रस्ते. या बैठकीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासाला आता गती मिळाली असून लवकरच हा भूसंपादन प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते.