शाश्वत शेतीसाठी प्रयोगशील शेती आवश्यक – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई दि. 23 : शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देऊन प्रयोगशील शेती करणे आवश्यक आहे. फळपिकाची लागवड करताना त्या-त्या पिकानुसार कोणते संरचनात्मक तंत्रज्ञान वापरावे आणि त्याचा उत्पादनावर काय परिणाम होईल याचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या तांत्रिक निकषाबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, द्राक्ष, संत्र, आंबा, केळी, डाळिंब, अंजीर या फळपिकांचे उत्पन्न आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्लास्टिक अथवा कपड्याचे पॉलीनेट वापरण्याचा परिणाम प्रत्यक्ष शेतावर जाऊन तपासावा. रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीचा परिणाम गुणवत्ता व उत्पादनावर कसा होतो. याबाबत कृतीशील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अनुभवाच्या आधारे अभ्यासपूर्वक अहवाल सादर करावा. शेती संशोधनाच्या दृष्टीने तांत्रिक दृष्टीकोन महत्वाचा असून, यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही सुधारता येईल, असेही त्यांनी सांगितले.

शाश्वत शेतीसाठी प्रयोगशील शेती करणे गरजेचे आहे. शासन द्राक्ष बागांना क्रॉप कव्हर तसेच डाळिंब फळपिकाला एन्टी हेलनेट कव्हर देत असून, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले.

बैठकीत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक दत्तात्रय काळभारे, तंत्रसल्लागार सचिन मोरे, राहुरी शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. सचिन डिंग्रे, यांच्यासह संग्राम विभुते, नामदेव पाटील, चेतन डेडीया, श्रीकृष्ण पवार उपस्थित होते.

 

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *