वैद्यकीय तज्ज्ञ, ‘एआय’ तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात प्रभावी मध्यस्थ प्रणाली गरजेची

‘पल्स’ वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषद

मुंबई दिनांक २७ : आरोग्य क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामकारक वापरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात समन्वय साधणारी प्रभावी मध्यस्थ प्रणाली विकसित करणे आणि त्यांच्यातील सहकार्यामुळे आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होऊन एकूणच गुणवत्तेत सुधारणा करण्याची येत्या काळात गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सिम्युलेशनच्या संभाव्यतेचे महत्त्व अधोरेखित केले असून निर्माण होणाऱ्या डेटाचा योग्य आणि अर्थपूर्ण उपयोग करणे आवश्यक असून तो वाया जाऊ नये, यावर भर देण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने ‘पल्स’ २०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी वैद्यकीय शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमतेचा सहभाग आणि वैयक्तिकृत शिक्षण पद्धती विषयावरील चर्चासत्रात सहभागी तज्ञांनी सहभागी होत मत व्यक्त केले.

या चर्चासत्रात केंद्र सरकारच्या एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्सचे मुख्य प्रकल्प समन्वयक तसेच मुंबई आयआयटीचे प्रोफेसर डॉ क्षितिज जाधव, देवर्षी शाह संस्थापक सिमुटोमी मेडटेक, डॉ. वैभव बागरिया ऑर्थोपेडिक्स विभाग प्रमुख, एच. एन. रिलायन्स, डॉ. राहुल पंडित अध्यक्ष (क्रिटिकल केअर आणि इमर्जन्सी) एच. एन. रिलायन्स, डॉ. जॉय चक्रवर्ती पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला.

चर्चेत आरोग्य क्षेत्रातील प्रत्यक्ष गरजा आणि वैद्यकीय सेवांची उपलब्धता यांच्यातील वाढत्या तफावतीवर प्रकाश टाकण्यात आला. मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा आणि रुग्णालय उपलब्ध होत असताना ही दरी कायम आहे. याचवेळी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगच्या वापरामुळे, आरोग्यसेवेत बदल होत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनी सतत नवीन गोष्टी शिकणे आणि जुन्या गोष्टींचे अभ्यास करणे आवश्यक आहे. अधिक प्रभावी प्रशिक्षणावर भर देण्याची गरज आहे

एआय आणि मशीन लर्निंगमुळे निर्णय प्रक्रिया सुधारता येते, रुग्णांचे प्राधान्य  अधिक कार्यक्षमतेने करता येते आणि मर्यादित संसाधनांचा योग्य वापर होतो.विमानवाहतुकीतील ऑटोमेशनप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कौशल्यांचे मूल्यमापन आवश्यक आहे.

वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मागोवा घेणारी, वैयक्तिक शिकण्याचे मार्ग तयार करणारी आणि त्यांच्या कौशल्यांचा सर्वांगीण विकास करणारी बुद्धिमान प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जात आहे. अशी प्रणाली आरोग्यसेवेच्या प्रत्यक्ष गरजांशी प्रशिक्षण अधिक सुसंगत करेल.

या परिषदेच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर त्या अनुषंगाने विविध टेक्नोक्रॅट्स वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचे देखील प्रदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या डॉ. पल्लवी सापळे यांनी चर्चेत सहभागी झालेल्या सदस्यांचे आभार  मानले व्यक्त केले. डॉ राजीव रॉय यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले.

0000

किरण वाघ/ वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *