नवी मुंबई विमानतळ परिसरातील नागरी सुविधांबाबत बैठक घेणार- मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि. २३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील नागरी सुविधाबाबत बैठक घेण्यात येईल अशी माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले, मुंबईतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. विमानतळाशी जोडणी अधिक मजबूत करण्यासाठी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला जात आहे. या विमानतळ परिसरातील नागरी सुविधांचा विकास टप्याटप्प्याने सुरू असून प्रवाशांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ज्या ठिकाणी काही उणीवा आहेत, त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ
मुंबईत टीबी निदानासाठी आवश्यक काट्रिजेसचा दुप्पट साठा उपलब्ध – मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. २३ : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग निदानासाठी आवश्यक असलेल्या काट्रिजेसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य पंकज भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला.
मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 2022 ते 2025 या कालावधीत मुंबईत 1 लाख 75 हजार चाचण्या करण्यात आल्या. या काळात टीबीचे प्रमाण 11 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत खाली आले. तसेच औषध-प्रतिरोधक टीबी रुग्णांच्या उपचारासाठी बीपाल्म उपचार पद्धतीही कार्यान्वित करण्यात आली आहे.
सीबी-नॅट आणि ट्रू-नॅट या दोन्ही चाचण्या क्षयरोग निदानासाठी समान स्वरूपाचे कार्य करीत असल्याने, तसेच आवश्यकतेनुसार थुंकी तपासणी आणि स्पुटम स्मिअर मायक्रोस्कोपी नियमितपणे केली जात असल्याने निदान प्रक्रियेत कोणताही विलंब झाला नाही. पर्यायी सुविधा उपलब्ध करून रुग्णांचे वेळेत निदान व उपचार सुरू ठेवण्यात आले. केंद्र शासनाकडून जानेवारी 2026 पासून सीबी-नॅट काट्रिजेसचा पुरवठा पुन्हा नियमितपणे सुरू झाला असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आता कोणतीही कमतरता नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
0000
शैलजा पाटील/विसंअ
वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई,दि.२३: वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय येथील स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने लावण्यात येतील, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य ॲड. अनिल परब यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले, वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय येथील स्कायवॉक काम पूर्ण झाले असून हा स्कायवॉक २६ जानेवारी २०२६ पासून वापरासाठी खुला करण्यात आली आहे. या मार्गावरून लोकांची ये-जा सुलभरित्या सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि ॲड. अनिल परब यांनी मागणी केल्यानुसार या स्कायवॉकच्या दोन्ही बाजूला सरकते जिने लावण्यात येतील, असे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
0000
एकनाथ पोवार/स.सं.
पीएमपीएमएल बस खरेदी निविदा प्रक्रिया बैठकीची चौकशी – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि. २३ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस खरेदी व निविदा प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि यासाठी तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीबाबत विधिमंडळ सदस्यांनी केलेल्या शंकांसंदर्भात चौकशी केली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सुनील शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अमित गोरखे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, बस खरेदी व निविदा प्रक्रिया बैठकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे आयुक्त, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सीआयआरटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. बस खरेदी व निविदा प्रक्रिया ही ठराव आणि मंजुरीची प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली आहे. केवळ यासाठीची बैठक तातडीने घेण्यात आली आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या शंकेच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल.
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, राज्यात पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, पुण्यात २५ टक्के अपेक्षित असलेल्या इलेक्ट्रिक बसच्या तुलनेत २७ टक्के बस कार्यरत आहेत. मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह सर्व प्रमुख शहरांत इलेक्ट्रिक बसांचे प्रमाण वाढवून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व पर्यावरणपूरक करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
एकनाथ पोवार/स.सं.
नागपूर पीएम ई-बस सेवा चालक वाहकांचे प्रशिक्षण न्यायालयाच्या निर्देशानुसार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि.२३:- नागपूर येथील पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत नागपूर शहरासाठी १५० बस मंजूर असून या बस साठी चालक व वाहकांचे प्रशिक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार घेतले जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अमित गोरखे यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, ई-बस सेवेला राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. पीएम ई- बससेवा योजनेंतर्गत राज्यातील २२ नगरपालिकांसाठी १५५९ बसेस मंजूर आहेत. यामधील १५० बसेस नागपूरसाठी आहेत. नागपूरसाठी मंजूर बस सुरू करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
0000
एकनाथ पोवार/स.सं.
म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. २३ : म्हाडाच्या लोगोच्या गैरवापरप्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष यांना देण्यात येतील असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिल परब, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, म्हाडाच्या नाव व बोधचिन्हाचा वापर केवळ विशिष्ट दोन प्रकल्पांच्या जाहिरातीपुरताच सशर्त परवानगीने करण्यात आला होता. मात्र, त्याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्येही लोगोचा वापर झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर म्हाडाकडून संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सद्यःस्थितीत इतर कोणत्याही प्रकल्पात म्हाडाच्या लोगोचा वापर होत नसल्याचे संबंधित विकासकांनी लेखी कळविले असून, तसे म्हाडा प्राधिकरणानेही स्पष्ट केले आहे. अनधिकृत लोगो वापर झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात चौकशीअंती जे निष्कर्ष समोर येतील, त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.
0000
शैलजा पाटील/विसंअ
अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. २३ : राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री झिरवाळ म्हणाले, वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, मुंबईसह मोठ्या शहरांत बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढीसाठीही शासन प्रयत्नशील आहे. विभागाकडील पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागात अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही मंत्री झिरवाळ म्हणाले.
सुगंधित सुपारी प्रश्नाच्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
0000
एकनाथ पोवार/स.सं.
वित्तीय स्वरूपाच्या पदासाठी कोणतीही पदवी ग्राह्य – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल
गुणवत्ताधारक उमेदवार मिळावेत यासाठी निर्णय
मुंबई, दि. २३ : राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील वित्तीय स्वरूपाच्या जबाबदारीच्या पदांसाठी केवळ वाणिज्य शाखेची अट न ठेवता कोणतीही पदवी ग्राह्य धरण्याचा निर्णय गुणवत्ताधारक उमेदवार मिळावेत आणि रिक्त पदे भरली जावीत, यासाठी घेण्यात आल्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, २०१२ पूर्वी अशा पदांसाठी कोणतीही विशिष्ट शाखेची अट नव्हती. मात्र, २०१२ नंतर अटी घालण्यात आल्या. त्यानंतरच्या काळात गुणवत्ता असलेले उमेदवार पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने, अनेक पदे रिक्त राहत असल्याचे निदर्शनास आले. भारताचे लेखा नियंत्रक व महालेखापाल, आयआरएस, जीएसटी यांसारख्या इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये वाणिज्य शाखेची सक्ती नसल्याचा दाखला देत, राज्यानेही त्या धर्तीवर धोरण अवलंबल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित पदांवरील काम केवळ अकाउंटिंगपुरते मर्यादित नसून ते सर्वसमावेशक कार्यालयीन कामकाजाशी संबंधित असल्याने विविध विषयांचे ज्ञान असलेले उमेदवार आवश्यक ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सद्यःस्थितीत महाराष्ट्र लेखा व कोषागारे संचालनालयांतर्गत, सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणारी कनिष्ठ लेखापाल आणि लिपिक-टंकलेखक हीच गट-क संवर्गातील पदे आहेत, ज्यासाठी सेवाप्रवेश नियमांत बदल करून कोणतीही पदवी ही शैक्षणिक अर्हता करण्यात आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ