विधानपरिषद इतर कामकाज

विधानपरिषद अर्धा तास चर्चा

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील

मुंबई, दि. १५  : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.

सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री विखे – पाटील यांनी माहिती दिली.

विखे-पाटील म्हणाले की, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे 21 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी 115 टीएमसी पाण्याच्या फेरजल नियोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, उजनी धरणातून 23.7 टीएमसी पाणी धाराशिव जिल्ह्यात वळवले जाणार आहे. या भागातील काही तालुक्यांमध्ये उपसा सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल.

या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘महाराष्ट्र रेसिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (MIDP)’ राबवण्यात येत आहे. फ्लड डायव्हर्जन ही यामधील मुख्य योजना असून, 13 मार्च 2024 रोजी त्याला मान्यता देण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत पूराच्या पाण्याचा उपयुक्त वापर होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्पाचा सर्वेक्षण अहवाल लवकरच अपेक्षित असून, पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात सुमारे 55 टीएमसी पाणी आणण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व्हेक्षण झाल्यानंतर वस्तुस्थिती सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर सुमारे 4000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, परंतु जागतिक बँकेच्या निधीमुळे आता अडथळा उरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी प्रकल्पाच्या निविदा निघतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, उजनी, जायकवाडी, कोयना आदी धरणांमधील गाळ काढण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असून, मान्यता मिळवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

बॅरेजेसबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, उजनी  धरणाचे 24-25 टीएमसी पाणी वाहून जात होते. सोलापूर महापालिकेसाठी स्वतंत्र पाईपलाईन उपलब्ध झाल्याने आता नदीपात्रात पाण्याचा प्रवाह थांबेल. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी जलसिंचन अडचणीत येऊ नये म्हणून भीमा नदीवर 11 नवीन बॅरेजेस प्रस्तावित करण्यात आले असल्याचे जलसंपदा मंत्री यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मंत्री डॉ. उदय सामंत

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातील सुरू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल, असे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्पांसंदर्भात अर्धा तास चर्चेच्या सूचना मांडल्या होत्या, त्यास मंत्री डॉ. सामंत यांनी उत्तर दिले.

मंत्री डॉ .सामंत म्हणाले की, वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने 20 दिवसांत गृह व परिवहन विभागाला अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

गाडी पार्किंगमध्ये असतानाही चलन मिळतात, हे गंभीर प्रकार आहेत. त्यांचीही चौकशी सुरु आहे. कोणी आणि कुठे कॅमेरे लावले, याची माहिती घेतली जात आहे, असे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी नमूद केले. आजपर्यंत महाराष्ट्रात 4 कोटी 95 लाख वाहने नोंदवण्यात आली आहेत. फक्त मुंबईत दररोज 794 नव्या वाहनांची नोंद होते. यामुळेच मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात मेट्रो प्रकल्पांची प्रगती सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईत 393.76 किमी, पुण्यात 136.42 किमी आणि नागपुरात 83.82 किमी लांबीचे मेट्रो प्रकल्प साकारले जात आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.5 ते 2 कोटी लोक दररोज मेट्रोने प्रवास करतील. मुंबईतील सागरी किनारा रस्ता हा ऐतिहासिक प्रकल्प असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, पूर्वी वांद्र्याहून नरिमन पॉईंटला पोहोचायला दीड ते दोन तास लागायचे, आता तोच प्रवास 17-18 मिनिटांत होतो.

पुढे बोलताना मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की, वसई-विरारपर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प केला आहे. शहरांत रिंगरोडसुद्धा उभारल्या जात आहेत. सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहरांतून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत.

सभागृहात सदस्य तांबे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, वाहतूक नियंत्रण करताना पोलीस, परिवहन आणि महसूल विभाग एकत्रित कारवाई करतात. यामुळेही ट्रॅफिक जाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, सर्व संबंधित मुद्दे त्या समितीत समाविष्ट केले जातील.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *