राज्य थॅलेसेमियामुक्त करूया – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ ( विमाका) : एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर १ ते ८ मेदरम्यान “संकल्प सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आयएमए हॉल, समर्थनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनजागृती, समाजाचा सहभाग आणि  आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला व मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या पीसीओडी (PCOD) क्लिनिकचे ऑनलाईन उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या आरोग्य सभापती डॉ. सुनिता सोळंके, आरोग्य सेवांचे उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, थॅलेसेमिया विषयावर कार्य करणारे तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे पालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, थॅलेसेमिया हा गंभीर अनुवंशिक रक्तविकार असून भविष्यात थॅलेसेमियामुक्त पिढी निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. थॅलेसेमियाग्रस्त बालके जन्माला येऊ नयेत यासाठी समाजाने जागरूक राहणे गरजेचे आहे. तसेच या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांवर आणि रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांना सामान्य जीवन जगता यावे यासाठी शासन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि बळकट करत आहे.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात सध्या सुमारे १३ हजार थॅलेसेमिया रुग्ण आहेत. या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारांसोबत अनेक सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी रुग्णांना प्रवास सवलत, वेळेत रक्त उपलब्धता आणि आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

महिलांच्या आरोग्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, नुकतेच राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे ८० हजार महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्याच धर्तीवर आता पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले असून राज्यातील महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमात रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टरांनी थॅलेसेमियाविषयी मार्गदर्शन केले. तसेच थॅलेसेमिया रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, पालक आणि रुग्णांनीही आपले अनुभव सांगितले.

यावेळी “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर, कर्मचारी, सेवाभावी संस्था, तसेच या आजाराचा यशस्वीपणे सामना करणारे रुग्ण आणि त्यांच्या पालकांचा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

*****

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *