मुंबई दि. २१ : मुंबई शहर जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील दर्जेदार शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत पीएम यशस्वी योजनेअंतर्गत ‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल्स फॉर ओबीसी, ईबीसी, डीएनटी स्टुडंट’ ही एकत्रित शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) वर ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ ओबीसी, ईबीसी, डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार असून लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल २.५० लाख रुपये असावे. विद्यार्थ्यांची निवड मागील वर्गातील गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्तायादीद्वारे होणार आहे. तसेच किमान ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सलग वर्षांमध्ये १०० टक्के निकाल देणाऱ्या सर्वोत्तम शाळांची निवड या योजनेत करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या रकमेत शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश यांचा समावेश आहे. आणि इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या रकमेत शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश, प्रयोगशाळा शुल्क तसेच कोचिंग फी यांचा समावेश आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अर्ज प्रक्रिया १ जून २०२६ पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत. त्रुटी दुरुस्ती तसेच संस्था पडताळणीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ आणि पडताळणीसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) वर जाऊन https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज अचूक व विहित मुदतीत भरून घेण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी साधावी, असेही आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0000
शैलजा पाटील/विसंअ