मुंबई, दि. ११ : जनगणना २०२७ च्या स्व-गणना प्रक्रियेत (वने व भूसंपादन) महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी आपली माहिती संगणकाद्वारे (एसई) पोर्टलवर नोंदविली.
मंत्रालयातील दालनात यावेळी भारत सरकारच्या सहसचिव तथा राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते. यावेळी डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्या हस्ते मिलिंद म्हैसकर यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.
भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच, देशातील प्रत्येक व्यक्तीला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही जनगणनेतील अशी प्रक्रिया आहे, ज्यात व्यक्ती जनगणनेची माहिती वेब पोर्टलद्वारे नोंदवितात. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एसई) पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ पर्यंत कार्यरत राहील.
जनगणना प्रगणक जेव्हा घरी भेट देतील, तेव्हा स्व-गणनेद्वारे नोंदविलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणासाठी त्यांना स्व-गणना आयडी (एसई आयडी) देणे आवश्यक असेल.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीने ही जबाबदारी स्वीकारून मोठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडण्याचे आवाहन मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी केले, जेणेकरून कुटुंबांची नोंद अचूकता आणि कार्यक्षमतेने होईल.
राज्यातील जास्तीत जास्त व्यक्तींनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून जनगणनेच्या देशव्यापी स्व-गणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी यावेळी केले.
00000
राजू धोत्रे/विसंअ