महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे राष्ट्रध्वजवंदन सोहळा

मुंबई, दि १ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा साजरा झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन करुन आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे, असे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, सचिव (2) श्रीमती मेघना तळेकर – इटकेलवार, सचिव (3) डॉ.विलास आठवले, सचिव (4) शिवदर्शन साठ्ये, सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, सुभाष नलावडे, उप सचिव रविंद्र जगदाळे, उमेश शिंदे, मोहन काकड यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राखीव सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *