महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. राज्यातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

मंत्री  सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महामंडळ अंतर्गत सर्व उपकंपनी यांच्या संचालक मंडळाची बैठक झाली.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए. बी. धुळाज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, महामंडळाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सर्व उपकंपनी यांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्धतेबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच महामंडळाच्या योजनांबाबत दिनदर्शिका तयार करण्यात यावी. महामंडळाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असावे.

या बैठकीत यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात आली. महामंडळाच्या संचालक मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *