मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रमांना समान भाषेतील उपशीर्षक

मुंबई, दि. ११ : मनोरंजन क्षेत्रातील दूरदर्शन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही सहज घेता यावा, यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने पुढाकार घेतला आहे. दूरचित्रवाणीमराठी कार्यक्रमांमध्ये उच्च दर्जाचे समान भाषेतील उपशीर्षक (Same Language Subtitles-SLS) उपलब्ध करून देण्याबाबत विभागाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली आणि प्लॅनेट रीड यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.

या उपक्रमामुळे मराठी कार्यक्रमांतील संवाद त्याच भाषेतील स्पष्ट, अचूक, समकालिक आणि वाचनीय उपशीर्षकांसह प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. संवादांसोबत आवश्यक ध्वनीविषयक माहितीही उपशीर्षकांमधून मिळणार असल्याने श्रवणदिव्यांग व्यक्तींसाठी कार्यक्रम अधिक सुलभ होतील.

मराठी कार्यक्रमांसाठी अचूक आणि गुणवत्तापूर्ण उपशीर्षके तयार करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी आयआयटी, नवी दिल्लीकडे आहे. यामुळे भाषिक तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळतानाच मनोरंजन क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचा सहभाग आणि समावेशकताही वाढेल.

भाषिक विकास, डिजिटल समावेशन आणि दिव्यांग सक्षमीकरण या तीनही उद्दिष्टांना एकत्रितपणे गती देणारा हा उपक्रम आहे. दूरदर्शन वाहिन्या, चित्रपट निर्माते आणि ओटीटी मंच यांच्या सक्रिय सहभागातून उपशीर्षकांची गुणवत्ता, अचूकता आणि सातत्य राखण्यावर भर दिला आहे.

दिव्यांग व्यक्तींना माहिती, मनोरंजन आणि डिजिटल माध्यमांचा समानतेने आनंद घेता यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गतही अशा समावेशक उपाययोजनांना कायदेशीर आधार मिळतो, या संदर्भात विविध वाहिन्यांनाही निर्देश देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *