भांडेवाडी येथील अत्याधुनिक घाऊक व किरकोळ मासळी बाजाराचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २८ : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील मौजे भांडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक घाऊक व किरकोळ मासळी बाजाराच्या बांधकामाला गती मिळाली असून, प्रकल्पाची सुमारे ३० टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील मत्स्यव्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच मच्छी विक्रेत्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात भांडेवाडी, नागपूर येथील अत्याधुनिक घाऊक व किरकोळ मासळी बाजाराच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त (दूरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत राज्यात मत्स्यव्यवसायासाठी आधुनिक आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर आहे. भांडेवाडी येथील घाऊक व किरकोळ मासळी बाजारामुळे विदर्भातील मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळेल. मच्छीमार, व्यापारी आणि ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होईल. हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि नियोजित मुदतीत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मासळीची साठवणूक, विक्री, वाहतूक आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, मत्स्यव्यवसायाशी संबंधित हजारो लाभार्थ्यांना त्याचा थेट फायदा होईल. आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि सुयोग्य बाजार व्यवस्थापनामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील मत्स्य व्यवसायाच्या विकासाला नवी दिशा मिळेल.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *