बोरीवली (पश्चिम) येथे २२ मे रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई, दि. १९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली कॉलेज, बोरीवली (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मे २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा सायली कॉलेज, गोराई रोड, एम.एच.बी. कॉलनी, गोराई नगर, बोरीवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात मुंबईतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच प्राथमिक निवड प्रक्रियाही याच ठिकाणी पार पडणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांची माहिती देण्यात येणार असून उमेदवारांना मोफत प्रशिक्षणाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इंटर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच आयटीआय व विविध शाखांतील पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त रोलेक्स अर्जुनराव भगत यांनी केले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *