सातारा दि. ११ : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 30 लाख घरे मंजुर केली होती. त्यातील 5 लाख घरे पूर्ण झाली असून याचा लोकार्पण व या योजनेसाठी 10 हजार कोटी निधी वितरणाचा कार्यक्रम सातारा येथे 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थित होणार आहे. तरी हा कार्यक्रम प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या निश्चित करुन यशस्वी करावा, असे निर्देश ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
15 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीचा आढावा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपाध्यक्ष राजु भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम सातारा येथे होत आहे, याचा अभिमान असल्याचे सांगून श्री. गोरे म्हणाले, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित रहावे यासाठी एसटी बसेस नियोजन करावे. त्यांच्यासाठी फुड पॅकेटची व्यवस्था करावी. उन्हाची तीव्रता जास्त आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जागोजागी पंखे व कुलरची व्यवस्था करावी. वेळ खूप कमी आहे त्यामुळे या कार्यक्रमाची प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी सामुहिक जबाबदारी घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असेही ग्रामीण विकास पंचायतराज मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जास्तीत जास्त लाभार्थी येण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना मदत करावी. कार्यक्रम सैनिक स्कूलच्या मैदानावर होत असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तसेच या कार्यक्रमास मंत्री महोदयांच्या संख्येनुसार हेलीकॉप्टर उतरण्यासाठी हेलीपॅड तयार करण्यात येतील.
मोठा मंडप उभारण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी लाभार्थी आणण्यासाठी 400 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थी हे जवळच्या तालुक्यातून येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी बैठकीत सांगितले.
0000