पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. १८ : राज्यातील ज्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या आहेत, ज्या योजनांमधून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे, अशा योजना तातडीने संबंधित ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व हातकणंगले तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन – नैनुटीया, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, सह सचिव गीता कुलकर्णी, पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या वैशाली आवटे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मयुरी पाटील उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन या दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाल्या होत्या.

मंत्री पाटील म्हणाले, पूर्ण झालेल्या योजनांचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण होणे आवश्यक आहे. योजना पूर्ण झाली असली, तरी तिचे अधिकृत हस्तांतरण झाले नसेल तर ती योजना पूर्ण झाल्याचे प्रशासनाच्या स्तरावर निश्चितपणे नमूद करता येत नाही. त्यामुळे ज्या योजनांचे काम पूर्ण झाले आहे आणि ज्या योजनांमधून पाणीपुरवठा सुरू झाला आहे, त्यांचे हस्तांतरण प्राधान्याने करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. काही गावांमध्ये जुन्या पाणीपुरवठा योजनेतून आधीच पाणीपुरवठा सुरू असल्याने नवीन योजनेतील कामे पूर्ण करून ती विद्यमान योजनेशी जोडून कार्यान्वित करता येतील. यामुळे नवीन वितरण व्यवस्था तसेच पाण्याच्या टाक्यांचा प्रभावी वापर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर येथील १३ गावांसाठी असणारी सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही १.२५ लाख लोकसंख्येसाठी असून ही योजना लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद अंतर्गत नागांव (ता.करवीर), शिरोली पुलाची (ता.), नागांव (ता. हातकणंगले) या गावांच्या पाणी पुरवठा योजना यांचा क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत २३ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांची कामे चालू असून २१ योजना पूर्ण झाल्या आहेत. यातील चार योजना हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना एका महिन्याच्या आत ग्रामपंचायतींना हस्तांतरित कराव्यात असे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित योजनांची, पाण्याच्या टाक्यांची तसेच वितरण व्यवस्थेच्या कामांची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या. विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांनी समन्वय साधून प्रत्येक योजनेची प्रत्यक्ष पाहणी, कार्यान्वित स्थिती आणि ग्रामपंचायतीकडे झालेले हस्तांतरण याबाबतचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले.

0000

गजानन पाटील/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *