पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न

नांदेड, दि. १५ ऑगस्ट: जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान व बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य सेवांच्या दर्जात गुणात्मक व परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय १४ मे २०२६ च्या अनुषंगाने जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या “जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”च्या या बैठकीस खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.

या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा आढावा आणि माहिती सादर करण्यात आली. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानके (NQAS) कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवांचे व आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करणे, आरोग्य संस्थांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांना सुलभरीतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम (NCD), महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेतर्गंत टोल-फ्री क्रमांक १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा, तसेच सर्वात महत्वाचे महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘माझ गावं-आरोग्य संपन्न गाव’ इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य विषयक सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि राज्य शासनाचे आरोग्य धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करणे, रुग्ण व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक व तात्काळ निराकरण करणे, विविध आरोग्य संस्था व विभागांतर्गत योग्य समन्वय प्रस्थापित करणे आणि आरोग्य उपक्रमांमध्ये लोकसहभाग अधिक व्यापक करणे, जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा गुणांकन दर्जा (Quality Standards) सुधारण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या.

जिल्ह्यात माता व बाल आरोग्यविषयक सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या.

या बैठकीच्या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आरोग्यविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *