नंदुरबार, दि. १७: राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे महिला व बाल रुग्णालयातील अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग आणि मातृदूध बँकेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या या सुविधा नवजात बालके व मातांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.कपिल आहेर, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, आदी. संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ३९ खाटांचे स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेच्या माध्यमातून अकाली, कमी वजनाच्या व गंभीर आजारी नवजात बालकांवर तज्ज्ञ उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. मातृदूध बँकेमुळे गरजू नवजात बालकांना सुरक्षित व तपासणी केलेले स्तनदूध उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
उद्घाटनानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा रुग्णालयात, जिल्हा सनियंत्रण व सल्लागार समिती, जिल्हास्तरीय पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समिती तसेच जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठका झाल्या. यावेळी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची जिल्हाभर व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा अधिकाधिक लाभ मिळेल, असे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा रुग्णालयातील रिक्त नर्सिंग पदे भरण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत जिल्हा रुग्णालय, नेत्र रुग्णालय, महिला रुग्णालय, आयुष रुग्णालय, एमसीएच विंग, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देणे, जिल्हा रुग्णालय परिसरात एमआरआय केंद्र स्थापन करणे तसेच जिल्हा रुग्णालय व निवासस्थान परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या विषयांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीला, ग्रामीण रुग्णालय धडगाव, उप रुग्णालय तळोदा व नवापूर येथील नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष तसेच ग्रामीण रुग्णालय शहादा येथील शस्त्रक्रिया विभागाचे ऑनलाइन उद्घाटन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. बैठकीच्या शेवटी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
००००