सिंधुदुर्गनगरी, दि. ५ (जिमाका) : देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. देवगड-जामसंडे शहराला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने भव्य नाट्यगृह, आधुनिक पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तसेच पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
देवगड शहरात शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा श्रीमती सावंत, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल, प्र. उपविभागीय अभियंता शैलेश मोरस्कर व सहायक अभियंता प्रणव देसाई उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, देवगड शहरात भव्य नाट्यगृह उभारण्याची स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही मागणी आता पूर्णत्वास येणार असून, त्यामुळे देवगडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल. याचबरोबर एका वर्षाच्या कालावधीत येथे आधुनिक पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार असून, पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. या वाढत्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी विविध पर्यटन प्रकल्पांची उभारणी आवश्यक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, तसेच जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल. देवगडवासीयांच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. देवगडचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही पालकमंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणाचा समतोल राखत पर्यावरणपूरक पर्यटन व उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे सांगून त्यांनी देवगड परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. अशा प्रकल्पांमुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवगडला पर्यटन, सांस्कृतिक वारसा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधणारे आदर्श पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री कामत यावेळी म्हणाले की, देवगड परिसरात नाट्य रसिक, नाट्य कलाकार यांची संख्या अधिक असल्याने या पर्यटन केंद्रात उभारण्यात येणारे नाट्यगृह नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असेही ते म्हणाले.
नगराध्यक्ष श्रीमती प्रभू म्हणाल्या की देवगड मध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. हे पर्यटन केंद्र नक्कीच पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री. बागुल यांनी केले. ते म्हणाले पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतून हे पर्यटन केंद्र विकसित होत आहे. या जागेत नाट्यगृह, वॅक्स म्युझियम उभारण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्राचे काम उत्कृष्ट आणि दर्जेदार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावित पर्यटन विकास केंद्राविषयी…
तळमजल्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर सुमारे ४५० ते ५०० प्रेक्षक क्षमता असलेले आधुनिक सभागृह तसेच सुसज्ज कला दालन उभारण्यात येणार असून विविध सांस्कृतिक, शासकीय व सामाजिक कार्यक्रमांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
भविष्यातील विस्तार योजनेअंतर्गत दुसऱ्या मजल्यावर वॅक्स म्युझियम, तर तिसऱ्या मजल्यावर म्युझिक लायब्ररी आणि पत्रकार भवन विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे पर्यटनाबरोबरच सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहिती क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.
प्रकल्पामध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, आधुनिक फर्निचर, ध्वनी व्यवस्था, पाणीपुरवठा, अंतर्गत व बाह्य विद्युत व्यवस्था, संरक्षक भिंत, भूखंड सुधारणा आणि आकर्षक परिसर सुशोभीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत.
देवगडच्या पर्यटन क्षमतेला नवी उंची देणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे.