मुंबई, दि. १९ : तुळजापूर येथील नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या बांधकामाला गती देऊन ते आधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले. महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने येणारे भाविक, मान्यवर तसेच शासकीय अधिकारी यांच्या निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित नवीन विश्रामगृहाचे बांधकाम दर्जेदार आणि आधुनिक पद्धतीने करण्याच्या सूचना मंत्री भोंसले यांनी दिल्या.
या संदर्भात मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या दालनात आढावा बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित नवीन विश्रामगृहाच्या G+2 इमारतीचे एकूण बांधकाम सुमारे ३ हजार ३६६ चौ.मी. क्षेत्रफळाचे आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा अंदाज तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहे.
विश्रामगृहाच्या बांधकामामध्ये गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. तुळजापूरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन प्रस्तावित विश्रामगृह हे आधुनिक सुविधांनी युक्त, सुरक्षित, आकर्षक आणि दर्जेदार असावे, यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी बैठकीत विशेष भर दिला. विश्रामगृहामध्ये सौर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच संपूर्ण इमारतीसाठी केंद्रीकृत वातानुकूलित प्रणाली बसविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक बांधकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा योग्य समन्वय साधून या प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“तुळजापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या भाविक, मान्यवर आणि शासकीय अधिकारी यांच्यासाठी निवासाची सुविधा अत्याधुनिक आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. प्रस्तावित नवीन विश्रामगृहाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होण्यासोबतच त्यामध्ये सौर ऊर्जा, केंद्रीकृत वातानुकूलन प्रणाली आणि आवश्यक आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात यावा. तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोरपणे तपासणी करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तुळजापूर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाढती संख्या, शासकीय तसेच प्रशासकीय गरजा आणि शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या नवीन जिल्हा विश्रामगृहामुळे निवासाच्या सुविधेत मोठी भर पडणार आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ