छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करा -जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, सुशासन, धैर्य आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिला, तो प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा असे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शन’ या नाटकाचे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या . या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे (आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक), अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय ९३ महाविद्यालये व शाळांमधील शिक्षक आणि ४०७ विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा उल्लेख केला. तरुण पिढीने शिवरायांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे त्यांनी म्हटले.

पद्मश्री उदय देशपांडे यांनी काही देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्धनीती आणि पराक्रमाचे धडे सैन्यदलांना दिले जातात, असे सांगत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आभार अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी मानले.

पदयात्रा व गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई टाऊन हॉल (सेंट्रल लायब्ररी), शहीद भगतसिंग रोड, फोर्ट येथून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे शिवरायांच्या जीवनपटावर आधारित विविध प्रयोगात्मक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *