चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामांचा आढावा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला.

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, बौद्ध धर्मगुरू, बुधिष्ठ सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, प्रदीप कांबळे, शशी प्रभू, तसेच सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची भव्य वास्तू उभी राहत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने हा मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरणविषयक मान्यता, तसेच हा मार्ग रुंद बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित विभागांकडून नियोजन करण्यात यावे.

या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वयाने यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

000000

किरण वाघ/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *