बुलढाणा, दि.१५ : जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘जिजाऊ सभागृहात’ आरोग्य विभागाची ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी’ आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे, तसेच कुपोषणमुक्ती आणि १०० टक्के आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग) मोहीम वेगाने राबविण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले.
गर्भलिंग निदानाला आळा घालण्याच्या सूचना
पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांवर केलेल्या कारवाईचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी कौतुक केले. समाजाच्या निकोप वाढीसाठी मुलींचा जन्मदर वाढणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करून ते म्हणाले, “स्त्रीभ्रूणहत्येसारखे कृत्य समाजासाठी अत्यंत क्लेशदायक आणि अनुचित आहे. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींना अजिबात पाठीशी न घालता, कोणताही विलंब न करता, त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”
कुपोषणमुक्तीसाठी विशेष मोहिमेची आवश्यकता
लहान मुले हे देशाचे भवितव्य असून, त्यांचे आरोग्य आणि स्वास्थ्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसह विशेषतः आदिवासी भागातील बालकांना संतुलित आहार मिळावा आणि कुपोषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करता यावी, यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. तळागाळात आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका अत्यंत उत्कृष्ट काम करत असून, त्यांच्या सेवांचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे लाभ घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
दुर्धर आजारांचे १०० टक्के ‘स्क्रीनिंग’ करा
कर्करोग, क्षयरोग (टीबी), उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आणि दुर्धर आजारांचे वेळीच निदान व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील नागरिकांचे १०० टक्के ‘स्क्रीनिंग’ (आरोग्य तपासणी) पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
आयुष्मान कार्ड तळागाळापर्यंत पोहोचवा
‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ला गती देऊन जास्तीत जास्त रुग्णालये व दवाखाने या मोहिमेत समाविष्ट करण्यावर त्यांनी भर दिला. जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्येक नागरिकाला ‘आयुष्मान कार्ड’ मिळावे, यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलावीत. याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामांचा आढावा
या बैठकीत नियमित लसीकरण आणि विविध आरोग्य मोहिमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात नव्याने उभारण्यात येत असलेल्या आणि नूतनीकरण सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (PHC) बांधकामांची सद्यस्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. ही कामे दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
००००