मुंबई, दि. १४ : राज्यातील अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत सर्वंकष विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या पदस्थापनेबाबतच्या बैठकीत ग्राम विकास मंत्री गोरे बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, तसेच शिक्षक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ग्राम विकास मंत्री गोरे म्हणाले की, राज्यातील १३ जिल्हा परिषदांमध्ये अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना नियमानुसार तीन वर्षांनंतर बदलीची संधी दिली जाते. गेल्यावर्षी राज्यभरात सुमारे ६६ हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेमुळे यंदा अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगून शिक्षकांच्या हिताचा विचार करून शासनाकडून योग्य आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.
अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचेही मंत्री गोरे म्हणाले. यावेळी शिक्षकांच्या अडचणी, विद्यमान नियम तसेच जनगणनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. शिक्षकांच्या विविध मागण्या व पदस्थापनेसंदर्भातील मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
0000
वंदना थोरात/विसंअ