वेबिनारच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

ठाणे, दि.25(जिमाका) :-  राज्य शासनाने रु. ८.०० लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलीचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे 1 ऑगस्टपासून https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

ऐरोली येथील पार्थ नॉलेज नेटवर्क येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, तंत्रशिक्षण  विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक विनोद मोहितकर, संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने  विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी हा संवाद  साधला.

या वेबिनारमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास 6 हजार शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनी, पालक व संस्थांचे प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री.पाटील म्हणाले की, या योजनेमध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क समावेश आहे. शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता संबंधित विद्यापीठ, तंत्रशिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इत्यादीकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क व शासन मान्यताप्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे १०० टक्के मर्यादेपर्यंत परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती स्वरुपात पात्र विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या विद्यार्थीनींनी प्रवेश घेतलेला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत, अशा महाराष्ट्रातील विद्यार्थिनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करतील, अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आले पैसे परत करण्यात येतील. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी बॅक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असले पाहिजे.

या योजनेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी,विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी, किंवा महाआयटी च्या पोर्टवरील  Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in , उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in , तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ  https://www.dtemaharashtra.gov.in , कला संचालनालयाचे https://doa.maharashtra.gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

मंजूर शिष्यवृत्ती सत्रनिहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थिनी पात्र असणारआहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री अतुल सावे यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, परदेशी शिष्यवृत्ती  योजना, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यार्थी निर्वाह भत्ता, शिकावू उमेदवारांना विद्यावेतन, स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *