विभागीय आयुक्तांकडून मोझरी विकास आराखड्यातील कामांचा आढावा

अमरावती, दि. 22 :  मोझरी हे ठिकाण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाज प्रबोधनाने पावन झालेली भूमी आहे. मोझरी विकास आराखड्यांतर्गत गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडी परिसरात पूर्ण झालेल्या इमारतीत सर्व सोयीयुक्त भक्तनिवास व युवक-युवतीकरिता रोजगार-स्वयंरोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे प्रभावी नियोजन करण्यात यावे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ यांच्या सूचनांना विचारात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजहितोपयोगी विचारांचे दर्शन त्यातून होईल, यादृष्टीने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी विकास आराखड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मोझरी विकास आराखड्यांतर्गत पूर्ण झालेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, नगरविकास उपायुक्त संतोष कवडे, नियोजन उपायुक्त हर्षद चौधरी, व्यवसाय शिक्षण विभागाचे सह संचालक प्रदीप घुले, रोजगार, स्वयंरोजगार कौशल्य विकास, उद्योजकता उपायुक्त दत्तात्रय ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, गुरुकुंज मोझरी येथे मोझरी विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांसाठी शासनाने 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यातून त्याठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आध्यात्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संकुल आणि ग्रामगीतेवर आधारित ग्रामविकास प्रबोधिनी आदी विकासकामे होणार आहेत. सद्यस्थितीत आश्रमच्या परिसरात स्मृती संग्रहालय, यात्री निवास, महासमाधी सौंदर्यीकरण आदी कामे झाली आहेत. दासटेकडी परिसरात निर्माण करण्यात आलेल्या चार इमारतीमधील एका इमारतीत भक्तांसाठी सर्व सोयीयुक्त 46 खोल्यांचे भक्तनिवास (स्वच्छतागृह, प्रशासकीय कार्यालय, स्वागत कक्ष आदींचा समावेश) तसेच उर्वरित इमारतींमध्ये युवक-युवतींसाठी अल्प मुदतीचे निवासी प्रशिक्षण केंद्र, इंटरनॅशनल स्कील सेंटर, प्रशिक्षणार्थींच्या निवासासाठी वसतिगृह आदी सुविधा त्याठिकाणी उभारण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

मोझरी विकास आराखड्यांतर्गत येत असलेल्या विविध विकासकामांबाबत कार्यान्वयन यंत्रणांसोबत सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सर्व संबंधित यंत्रणांनी विकास आराखड्यांतर्गत नियोजन अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *