ठाण्यातील १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक ‘ऑफिसर्स क्लब’चे नूतनीकरण

ठाणे,दि. १७ (जिमाका): प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या क्रीडा, आरोग्य आणि परस्पर संवादाला नवी दिशा देणाऱ्या ठाण्यातील १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक ‘ऑफिसर्स क्लब’चे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी करण्यात आले.

शतकाचा गौरवशाली वारसा लाभलेल्या या वास्तूला आधुनिक रूप मिळाल्यामुळे अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्त दिनक्रमातून अधिकाऱ्यांना विरंगुळा मिळावा, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि आपापसातील सौहार्द वाढीस लागावे, या उद्देशाने या वास्तूचा कायापालट करण्यात आला आहे.

आता या क्लबमध्ये अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, बिलियर्ड्स टेबल, सुसज्ज व्यायामशाळा (जिम) आणि उत्कृष्ट कॅफेटेरिया अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक क्लबचा अधिकाऱ्यांनी सक्रीय वापर करून या परिसराला आरोग्य आणि संवादाचे एक चैतन्यमय केंद्र बनवावे, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा ऑफिसर्स क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

शंभर वर्षांचा वारसा जपतानाच क्लबला नवे रूप देण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक होते. हे नूतनीकरणाचे कार्य दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि मोलाचे योगदान दिले, त्या सर्व सार्वजनिक बांधकाम व क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासन आणि मान्यवरांकडून विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.   या नव्या सुविधांमुळे सर्व अधिकाऱ्यांना उत्तम आरोग्य आणि एकत्र येण्यासाठी एक हक्काचे आणि दर्जेदार व्यासपीठ लाभले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *