यवतमाळ, दि. १५: देशाला स्वातंत्र्य मिळाले, आता ‘रासायनिक अन्नातून स्वातंत्र्य’ मिळवण्याची वेळ आली आहे आणि ती ताकद रानभाज्यांमध्ये आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, उपवनसंरक्षक नवनीत मिश्रा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख दिपक कच्छवे, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, पशुसंवर्धन उपायुक्त मंगेश काळे तसेच महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले की, झीरो बजेट असलेल्या रानभाज्या ह्या निसर्गाने दिलेला आरोग्याचा ठेवा आहे. आधुनिक युगात फास्ट फूडच्या मागे धावणाऱ्या नव्या पिढीला रानभाज्या या पारंपरिक आणि आरोग्यदायी आहाराची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. रानभाज्यांच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी आणि नागरिकांना माहिती होण्यासाठी विशेष उपक्रम म्हणून जिल्ह्यात ‘रानभाजी ॲग्रो-टुरिझम’ उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच पुढील काळात तीन दिवसीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी, महिला बचत गटांनी उभारलेल्या रानभाजी स्टॉल्सला भेट देवून पालकमंत्र्यांनी रानभाज्यांच्या निरनिराळ्या प्रजातींची माहिती घेत खरेदी केली. तसेच नागरिकांना आपल्या आहारात रानभाज्यांचा वापर वाढवून आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी विकास मीना म्हणाले, जिल्ह्याचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी काम करत आहे. कृषी विभागामार्फत विविध स्पर्धा आयोजित करुन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना महाविस्तार ॲपद्वारे शेतीविषयक माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रानभाज्या शरीरासाठी उपयुक्त असून आरोग्यदायी जीवनासाठी त्यांचा वापर करावा. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देत आहोत. नागरिकांनी या रानभाज्या खरेदी करुन शेतकऱ्यांना प्रोस्ताहित करावे. तसेच जलसंवर्धनासाठी आयोजित उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी रानभाज्यांचे महत्त्व विषद केले.
यावेळी कृषी विभागाच्या फार्मर गृप लिग स्पर्धेतील विजेत्यांचा आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले, सुत्रसंचालन जितेंद्र सातपुते यांनी तर आत्माचे प्रकल्प उपसंचालक व्यंकट कुंटावार यांनी आभार मानले.
०००