कोल्हापूर दि : २६ (जिमाका) जलसंपदा विभागाकडून ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो अशा संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन करणार असल्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले .
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत मुख्य अभियंता (ज. सं.) कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुण्याचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाची सुमारे 56 हजार एकर जमीन जलसंपदा विभागाने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यात राज्यामधील दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला जलसंपदा विभाग प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणाच्याच ठिकाणी कार्यरत राहतील याचे नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी मंत्री विखे पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, या विभागाने काळमवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता देऊन या धरणाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा) अनुषंगाने त्वरीत येथील कामकाजाला प्रारंभ करण्यात यावा. कोल्हापूर शहरातील ब्ल्यू व रेड लाईनबाबत ठोस असा निर्णय व्हावा. त्याचबरोबर अलमट्टी धरणाच्या अनुषंगाने जे सातत्याने उभे राहणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जलसंपदा विभागाने सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी बोलावे, अशी आग्रही मागणी त्यां केली.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात जरी मुबलक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यात अनेक सूक्ष्म प्रकल्पांची आवश्यकता आहे. त्याची उभारणी करण्यात यावी. शेतकऱ्यांमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाणी वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
मुख्य अभियंता (ज.सं.) अलका अहिरराव यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी मंत्री विखे पाटील यांनी सिंचनभवन येथील अद्यावत अशा जलसंपदा विभागीय कार्यालयाची पाहणी करून तेथे वृक्षारोपण केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी आभार मानले.
०००