‘का रुसली रखुमाई’ संगीतमय नाट्यप्रयोगातून भक्तीपरंपरेचा भावस्पर्शी आविष्कार

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा जागर घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘का रुसली रखुमाई’ या विशेष संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 25 जुलै, 2026 रोजी दुपारी 4 वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे होणार आहे.

वारकरी संप्रदायातील विठ्ठल-रखुमाई यांच्या भक्ती, प्रेम, समर्पण आणि अध्यात्मिक मूल्यांचा प्रभावी कलात्मक आविष्कार या संगीतमय नाट्यप्रयोगातून सादर करण्यात येणार आहे. विठ्ठल-रखुमाई यांच्या नात्यातील भावस्पर्शी प्रसंग, भक्तीचा गूढ अर्थ आणि वारकरी संप्रदायातील समता, प्रेम व श्रद्धेचा संदेश नाट्य, संगीत, अभिनय आणि प्रभावी दृश्यरचनेच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला जाणार आहे.

या विशेष नाट्यप्रयोगाचे लेखन विनोद रत्ना यांचे असून दिग्दर्शन पियुष कुलकर्णी यांचे आहे. संगीत संयोजन साई–पियुष, नेपथ्य ऋतुजा बोथे, प्रकाशयोजना अभिप्राय कामठे यांची आहे. कैवल्य केजकर यांचे गायन, तन्मयी कांबळेकर यांचे निरुपण; तसेच चिन्मय पटवर्धन, शुभांगी जाधव आणि अदिती द्रविड यांच्या अभिनयातून हा नाट्यप्रयोग अधिक प्रभावीपणे साकारला जाणार आहे.

भक्ती, समता, प्रेम, श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. या विशेष संगीतमय नाट्यप्रयोगास प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

००००

संजय ओरके/विसंअ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *