ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी

मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तथापि, आधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. तसेच अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे.

या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी  २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *