कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा- पालकमंत्री शंभूराज देसाई  

सातारा दि. १ : पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन कमी पाण्यात जास्त पिके घेता येतात. याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच येत्या काळात धरणांमधील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 चा समारोप पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाला. या समारोप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजु भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अभय काटकर आदी उपस्थित होते.

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, धरणामधील पाणी हे कॅनॉलद्वारे पाटामधून शेतकऱ्यांच्या शिवारात जाते. यामधील पाण्याचा अपव्यव होणार नाही याबरोबरच धरणांमधील गळती काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागाने प्राधान्य द्यावे. हवामान विभागाने या वर्षी सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार धरणांमधील पाणी 10 जून पर्यंत पुरेल याप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे. जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना पालकमंत्री म्हणून सहकार्य राहील, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, अहिल्यादेवींनी स्त्री-पुरुष समानता, जलव्यवस्थापन आणि मंदिर निर्मितीसाठी केलेले कार्य अजरामर आहे. अनेक संकटांचा सामना करूनही त्यांनी लोककल्याण जोपासले. त्यांचे चरित्र आचरणात आणल्यास एक सुंदर समाज व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप कार्यक्रमास जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.  

0000 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *