नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. ३० एप्रिल : नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज करण्यासाठी धावपट्टी विस्तार, अतिरिक्त सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, विमानतळ संचालक अमरदीप सिंग सेहरा, संचालक व्यवस्थापक निलेश सोनटक्के यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सध्या नांदेड येथून सात ठिकाणी विमानसेवा सुरू असून लवकरच ती दहा ठिकाणी वाढविण्याचे नियोजन आहे. वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दोन ते तीन विमाने उतरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे पर्यायी धावपट्टीसाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण करून नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या.

याशिवाय विमानतळ विस्तारीकरणासाठी जागा, विमानतळ परिसरातील उंच बांधकामे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, तसेच संरक्षण भिंतीलगतच्या भागांचे सर्वेक्षण महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विमानतळ प्राधिकरण यांनी संयुक्तरित्या करावे. प्रवाशांना सर्व सुविधा उपलबध होतील यादृष्टीने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्याकडे सादर करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा, विमानतळ परिसरातील सुरक्षा यासह विमानतळापर्यंत प्रवाशांना टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *