मुंबई उपनगर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर

मुंबई, दि.८ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षण दररोज सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ७.३० या दोन सत्रांमध्ये दिले जाईल. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिबिर सुरू होणार आहे.

या शिबिरामध्ये हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स तसेच फिटनेस आदी विविध मैदानी खेळांचे आधुनिक व तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शकांसह जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन लाभणार आहे.

८ ते २१ वयोगटातील मुले व मुली या शिबिरात सहभागी होऊ शकतात. शिबिर पूर्णपणे विनामूल्य असून नियमित उपस्थित राहणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरातील जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे. इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी गुगल फॉर्म भरावा तसेच अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मनिषा गारगोटे (मो. 8208372034) यांच्याशी संपर्क साधावा, असे निर्देश क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *