देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
मुंबई दि. १०: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू असून जमिनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम (सर्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू असून जमिनी बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. पुणे रिंग रोडप्रमाणे विशेष मोबदला, पुनर्वसन योजना आणि अलाईनमेंट बदलण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य सीमा हिरे यांनीही सहभाग घेतला.
या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भोसले यांनी सांगितले की, प्रस्तावित रिंग रोडचे एकूण अंतर सुमारे ६५.६० किलोमीटर असून त्यापैकी १६ किलोमीटरचा मार्ग नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रिंग रोडच्या मार्गाच्या आखणीस व त्यासाठीच्या बांधकामासाठी सुमारे ३,६५९ कोटी रुपये रकमेस मान्यता देण्यात आली आहे.
मंत्री भोसले यांनी सांगितले, भूसंपादनाच्या प्रक्रियेत जमिनींचे मूल्यांकन रेडी रेकनर दरानुसार तसेच जमिनीची प्रतवारी, जिरायती-बागायती स्वरूप आदी बाबी विचारात घेऊन करण्यात येत असल्याने गावनिहाय दरांमध्ये फरक दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रकल्पामुळे कोणावरही अन्याय होऊ नये आणि ज्यांच्या जमिनी किंवा घरे बाधित होत आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे रिंग रोडप्रमाणे विशेष पॅकेज देण्याबाबतही शासन सकारात्मक असून आवश्यक असल्यास हा विषय महसूल विभाग आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला जाईल, असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले
अलाईनमेंट बदलण्याबाबत काही भागांत संरक्षण खात्याची जमीन असल्याने त्या मार्गाने रिंग रोड नेणे शक्य नसल्याचे आढळले आहे. मात्र लोकांच्या सोयीसाठी यापूर्वी दोन ठिकाणी अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आले असून शक्य तेथे सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच डीपी रोड संदर्भात नगरविकास विभाग आणि नाशिक महानगरपालिकेशी आवश्यक समन्वय साधण्यात येईल, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
०००
मोहिनी राणे/स.सं.
अचलपूरमध्ये अमृत योजनेअंतर्गत क्रॉस लाईन कनेक्शनचे काम सुरू – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. १०: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तपासणी करण्यात आली असून प्रकल्पात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. मात्र काही भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक असलेली क्रॉस लाईन कनेक्शनची कामे नगरपरिषदेकडून सुरू आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात २०१८-२०१९ मध्ये अमृत योजनेंतर्गत सुमारे २२ कोटी रुपये खर्च करूनही नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा मुद्दा सदस्य प्रविण तायडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, अचलपूर नगरपालिका क्षेत्रात २०१८-२०१९ मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्प राबविण्यात आला असून तो २०१९ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात काही ठिकाणी क्रॉस लाईन कनेक्शन राहिले होते. त्यामुळे नगरपरिषद स्वतःच्या खर्चातून ही कामे करत आहे.
आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून ४७ ठिकाणी क्रॉस लाईन कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. उर्वरित कामही नगरपरिषदेमार्फत सुरू असून संपूर्ण योजनेचे हायड्रॉलिक टेस्टिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित भागातही पाणी पुरवठा सुरळीत होईल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
०००
मोहिनी राणे/स.सं.