छत्रपती संभाजीनगर दि. ८: छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत पैठण तालुक्यातील महसूल मंडळ निलजगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, भूमी अभिलेख उपअधीक्षक भास्कर खरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते.
नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. शिबिरात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विविध अर्ज स्वीकृतीसाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविण्यात आली.
या शिबिरात एकूण ७४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ७ अर्ज जागेवरच निकाली काढण्यात आले, तर उर्वरित अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आले. तसेच विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
ई-फेरफार अंतर्गत प्राप्त सर्व फेरफार अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. या शिबिरात ग्रामपंचायत, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, सेतू सुविधा केंद्र, बचत गट, अनुलोम विभाग तसेच तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या विविध विभागांचा सहभाग होता.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. महसूल मंडळ निलजगावच्या मंडळ अधिकारी भारती मादनकर यांनी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व संबंधित विभागांच्या सहकार्याने शिबिराचे सुयोग्य नियोजन केले.
प्रशासनाचा समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत निलजगाव येथील हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिली.
दरम्यान, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी तुर्काबाद (गंगापूर) येथेही भेट देत महसूल विभागात गेल्या काही वर्षांत आणि चालू वर्षात करण्यात आलेल्या विविध सुधारणांबाबत माहिती दिली. तसेच शिबिराच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन काही समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
००००