अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि.५ : ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित रस्ते कामांना गती देण्यात यावी. या अनुषंगाने कर्जत-जामखेड, जि. अहिल्यानगर परिसरातील विविध रस्ते कामांचा पुढील १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश  विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुका व परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्ते कामांबाबत आज विधानभवन येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीत काष्टी, श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगण, डिकसळ, म्हाळसुंदा–निंबे, आळसुना–निंबे–आंबेजळगाव तसेच कोंभळी फाटा ते कोंभळी या प्रमुख मार्गांसह सर्व प्रलंबित रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामातील विलंबाबाबत जबाबदारी निश्चित करून प्रलंबित कामांची सखोल चौकशी करावी आणि आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले. तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर द्यावा असेही सांगितले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) संजय दशपुते, मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक नाशिक जी. मल्लीकार्जुन, अधीक्षक अभियंता  विजय पाटील, कार्यकारी अभियंता  अ. भा. चव्हाण, वनसंरक्षक विवेक होशिंग, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग  प्र. शां. औटी, अधीक्षक अभियंता अहिल्यानगर विवेक माळुंदे, सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे आदी अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *