आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. ११ : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, उद्योगसुसंगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (टीआयआयएस), मुंबई यांच्यात मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये २४० आदिवासी विद्यार्थ्यांना प्रगत औद्योगिक तंत्रज्ञान विषयक विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे मुख्य वित्त अधिकारी (सीएमओ) मयंक पलन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण आणि उद्योगमानक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चित रोजगारसंधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समार्फत पार पाडली जाणार आहे.

सचिव विजय वाघमारे म्हणाले, आदिवासी युवांना प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा विभागाचा प्राधान्यक्रम आहे. टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्ससोबत करण्यात आलेला हा करार केवळ कौशल्य विकासापुरता मर्यादित नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील रोजगारक्षमतेसाठी भक्कम व टिकाऊ पाया निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या संयुक्त सहभागातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नव्या संधी निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

या करारांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EV), रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ३ डी प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही बॅटरी तंत्रज्ञान या प्रगत आणि भविष्योन्मुख औद्योगिक क्षेत्रांतील सात विशेष अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून आदिवासी तरुणांना आधुनिक उद्योग क्षेत्राशी सुसंगत कौशल्ये प्राप्त करून रोजगारक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, सदन अधिकारी विजय गुण्ड, नविन पृथ्वी, युएनडीपीचे प्रतिनिधी उज्ज्वल पहुरकर, उदयन मोहापात्रा व टीम, तसेच टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे अधिकारी श्रेयस पाटकर, राधेश्याम उपस्थित होते.

या सहकार्य कराराचे संकल्पनात्मकरण आणि सुलभीकरण यूएनडीपी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) यांच्या सहाय्याने करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *