‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत ९ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीवर प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत श्री. सागर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली आहे.

‘उमेद’ अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बचत व कर्ज सुविधा, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. ‘लखपती दीदी’ उपक्रम, शेतकरी उत्पादन कंपनी (FPO), सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, एकात्मिक शेती समूह (IFC) तसेच ‘नमो ड्रोन दीदी’ यासारख्या अभिनव योजनांमुळे महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

यासोबतच स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) यांच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायांसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न वाढण्यास, त्यांचा आत्मविश्वास बळकट होण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे श्री. सागर यांनी या मुलाखतीत सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी आर्थिक स्वावलंबन साध्य करावे, असा संदेशही त्यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल अॅपवरही ऐकता येणार आहे. या मुलाखत निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *