लोहगावासह ११ नवीन गावांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १२ : पुणे महापालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा समावेश प्रस्तावित असलेल्या विकास आराखड्याची (डीपी) अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, कायद्यानुसार सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम डीपी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सदस्य बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, संबंधित डीपीचा मसुदा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून ६० दिवसांची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया होणार आहे.
मंत्री सामंत म्हणाले की, रस्त्यांची आरक्षणे, घरांवर पडलेली आरक्षणे, काही बिल्डरांच्या जमिनी वगळणे आदी सर्व तक्रारी आणि हरकती सुनावणीत विचारात घेतल्या जातील. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. सुनावणी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीपी जाहीर केला जाणार नाही. शेतकरी, नागरिक, भागधारक यांनी केलेल्या हरकती, सूचना विचारात घेवूनच डीपी अंतिम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ
भिवंडी येथे डम्पिंग ग्राउंडसाठी जागा निश्चित – मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर, दि. 12 : भिवंडी शहरातील सर्व्हे क्रमांक 130 आणि सर्व्हे क्रमांक 139 ही जागा नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी अंतिम करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानुसार या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव शासन मंजूर करेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यासंदर्भात विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या सूचनेच्या उत्तरात मंत्री श्री. सामंत म्हणाले की, विद्यमान ‘डम्पिंग ग्राउंड’ शहरालगत तसेच वस्तीलगत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी पर्याय म्हणून नवीन जागा निश्चित करणे अत्यावश्यक झाले आहे.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, शहरात येणाऱ्या कचऱ्याच्या उघड्या गाड्यांमुळे होणारा त्रास थांबवण्यावरही भर देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, यासंदर्भात शासनाने एनजीटीच्या नियमांनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असून अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त, संबंधित अधिकारी आणि स्थानिक सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. तसेच विभागीय आयुक्तांना प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याचेही निर्देश देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. सामंत म्हणाले.
0000
संजय ओरके/विसंअ
मुंबईतील २० हजार इमारतींना भोगवटा देण्याच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि.१२ : बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल २० हजार इमारतींना भोगवटा देऊन दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर, मुरजी पटेल, अनंत नर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, मुंबईकरांची गेल्या ५० वर्षांची मागणी काल उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात पूर्ण केली. या निर्णयाचा थेट लाभ 4 ते 5 लाख सदनिकांना म्हणजेच जवळपास 20 लाख नागरिकांना होणार आहे. याबाबत, मुंबईच्या आयुक्तांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
या निर्णयामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेले पुनर्विकास, बँक कर्ज, खरेदी-विक्री आणि विविध परवानग्यांवरील अडथळे दूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना पूर्वीप्रमाणे व्यवहार करता येणार असून विकासकामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यासाठी एक खिडकी योजना उभारणी करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेऊन मुंबईकरांना त्रास होणार नाही, त्या दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ