निधी चौधरी यांच्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचे वास्तव उभे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचा केवळ संदेशच नाही, तर वास्तव चित्र उभे राहत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या निधी चौधरी यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे  कौतुक केले.

एकीकडे प्रशासकीय जबाबदारी आणि दुसरीकडे आपली कला जोपासत सनदी अधिकारी चौधरी सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या २२ जूनपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांनी चित्रांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जगात प्रचलित असलेल्या विविध कथांवर आधारित त्यांनी चित्र रेखाटली आहेत. त्यांच्या एकूण ४० चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून यातील काही चित्रांमध्ये महापुरुषांच्या तत्त्वांचाही समर्पक वापर करण्यात आला आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *