वसतिगृहांसाठी तातडीने जागा निश्चित करा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १८ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित करण्यात आलेली नाही, त्या जिल्ह्याचा तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतिगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी येऊ नयेत यासाठी वसतीगृहांना भेटी देऊन सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करावी, अशी सूचना मंत्री सावे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्यासाठी नियोजन करण्यात यावे. वसतिगृह आणि आश्रमशाळांचे जीपीएस मॅपिंग करावे. वसतिगृह व्यवस्थापन आणि नामांकित शाळा पोर्टलची अंमलबजावणी तातडीने करावी. योजना लाभार्थ्यांमध्ये ५० टक्के महिला लाभार्थी असावेत. जिल्हाधिकारी कार्यालये व मंत्रालयात योजनांची माहिती डिजिटल होर्डिंगद्वारे द्यावी. तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन विभागस्तरावर करण्यात यावे. यशोगाथांची माहिती पुस्तिका तयार करावी. विभागातील नवीन भरती प्रक्रिया, प्रशिक्षण, नियुक्त्या आणि रेकॉर्ड अद्ययावतीकरणाची प्रलंबित कामे तातडीने करावी, असेही मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *